नागपूर : उपराजधानी नागपुरात पार पडलेल्या १०८व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी झालेल्यांना कोरे प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत. कोरे प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य अॅड. मनमोहन बाजपेयी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना पत्र लिहिले आहे.
वितरित करण्यात आलेल्या कोऱ्या प्रमाणपत्रांवर सहभागी झालेल्यांना स्वतः त्यांचे नाव लिहायचे आहे. स्वत:च सदस्यत्व क्रमांक आणि स्वत: सहभागी झाल्याची तारीख लिहायची आहे. सहभागी न झालेल्यांनीही असे प्रमाणपत्र मिळवित नोंद केल्यास त्याचे काय होणार आहे, असा प्रश्नही बाजपेयींनी उपस्थित केला आहे. सहभागी झालेल्यांकडुनच माहिती भरून घेणार असाल तर आयोजकांचे काय असेही बाजपेयी यांनी पत्रात नमूद केले आहे. इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. यादरम्यान झालेल्या अव्यवस्थेची तक्रार मिनिस्ट्री ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीला केली जाईल, असा इशाराही बाजपेयींनी दिला आहे.