Nagpur | नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज फक्त 10 दिवस होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नाराज झाले आहेत. 7 ते 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्यातही चार दिवसांची सुटी आडवी आली आहे. (Opposition Leader Vijay Wadettiwar Unhappy Due To Less Working Days Of State Winter Assembly Session At Nagpur)
7 डिसेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 14 दिवसांपर्यंत राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. परंतु सुट्या वगळता विधिमंडळाचे प्रत्यक्ष कामकाज 10 दिवसच होईल. अनेक विषय असल्यामुळे अधिवेशन किमान तीन आठवडे चालावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
राज्यातील अनेक मोठे प्रश्न आहेत. त्यावर विस्ताराने चर्चा होणे आवश्यक आहे. बेरोजगारी, रूग्णालयांचे प्रश्न, मंत्र्यांचे भ्रष्टाचार प्रकरणं, राज्यातील अनागोंदी कारभार, शासकीय, अशासकीय कामकाज, विनियोजन बिलं, अंतिम आठवडा, पुरवणी मागण्यांसाठी चर्चा, राज्यातील संकटात असलेल्या शेतकरी अशा विविध विषयांसाठी 10 दिवस कमी आहेत, असे ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, आम्ही कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तीन आठवड्यांच्या अधिवेशनाचा आग्रह धरला होता. परंतु शासन याविषयी गंभीर नसल्यामुळे त्यांनी पळपुटेपणाचे धोरण स्वीकारले. आता अधिवेशनाचे कामकाज केवळ 10 दिवसच होईल.