Home » कॉंग्रेसने मंडल आयोगाच्या शिफारसींकडे दुर्लक्ष केल्यामुळे ओबीसी कमजोर : डॉ आशिष देशमुख

कॉंग्रेसने मंडल आयोगाच्या शिफारसींकडे दुर्लक्ष केल्यामुळे ओबीसी कमजोर : डॉ आशिष देशमुख

by नवस्वराज
0 comment

अकोला : भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेतर्फे अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी जनसंपर्क साधून सभा घेण्यात आल्या. जनसंपर्काच्या माध्यमातून ओबीसी जागर यात्रेचा उद्देश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या आयोजनात आणि कुशल नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करीत आहे.

अकोला येथे आयोजित भव्य सभेत डॉ. आशिष देशमुख म्हणाले, २ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी जागर यात्रा महाराष्ट्र पालथी घालायला निघाली. केंद्र आणि राज्याच्या ओबीसींच्या फायद्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात म्हणून ही यात्रा काढली आहे. भाजपा ओबीसींचा आणि ओबीसी भाजपाचा हा आमचा मूलमंत्र आहे. ओबीसी हा भाजपाचा गाभा आहे, भाजपाचा डीएनए आहे. जर कॉंग्रेस ओबीसींबद्दल प्रेम दाखवत असेल तर ते ‘पुतना मावशी’चे प्रेम आहे. कॉंग्रेसने मंडल आयोगाच्या शिफारसींकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे ओबीसी आर्थिकदृष्ट्या कमजोर राहिला. कॉंग्रेस ओबीसी आणि मराठा समाजाबद्दल संभ्रम निर्माण करून धूळफेक करीत आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून ओबीसी समाजातील सर्व घटकांना फायदा होणार आहे. भाजपा ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. घरकुल योजना, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, मेडिकलच्या शिक्षणामध्ये आरक्षण अशा अनेक योजना सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत. देशात १६३ एमएलसी भाजपाचे आहेत, त्यापैकी ६५ ओबीसी समाजाचे आहेत. आपल्या संपूर्ण देशात ३०३ खासदार भाजपाचे आहेत. त्यापैकी ८५ खासदार हे ओबीसी समाजाचे आहेत. २ वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदिंनी देशाच्या कॅबिनेटचा विस्तार केला, त्यामध्ये ३० टक्के पेक्षा जास्त मंत्री ओबीसी समाजाचे घेतले. स्वत: मोदी देखील ओबीसी समाजाचे आहेत. देशाचे पहिले ओबीसी पंतप्रधान नरेंद्र मोदी असून भाजपाने ओबीसींना न्याय देण्याचे काम केले आहे. १९५२ पासून आजपर्यंत कॉंग्रेसने फक्त १७ टक्के ओबीसी मुख्यमंत्री केले. त्या तुलनेत भाजपाने ६८ मुख्यमंत्र्यापैकी २१ मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे केले. संपूर्ण देशात भाजपाचे १३५८ आमदार आहेत. त्यापैकी ३६५ निवडून आलेले विधासभेतील आमदार हे ओबीसी समाजाचे आहेत, म्हणजेच २७ टक्के आमदार ओबीसी समाजाचे आहेत. तिकीट जास्त ओबीसींना दिले होते पण ३६५ निवडून आलेत.

ओबीसी एमएलसीची टक्केवारी ४० आहे. १२ बालूतेदारांसाठी अनेक योजना आणून भाजपा ओबीसींना एकत्रित आणण्याचे काम करीत आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाबरोबर साखरपुडा केला, पण लग्न होताना दिसत नाही. बाळासाहेबांची परिस्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. आदरणीय बाबासाहेबांना पराभूत करणाऱ्या कॉंग्रेसच्या आघाडीसोबत ते गेलेत. भाजपा अकोला येथे बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. भाजपचा निर्धार, करू या ओबीसींचा उद्धार, असे डॉ. देशमुख म्हणाले.

याप्रसंगी संजय गाते- अध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र, अर्चना डेहनकर- प्रदेश महामंत्री ओबीसी मोर्चा, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे , आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, अनुप धोत्रे, माजी आमदार बळीराम सिरसकार माजी आमदार नारायण गव्हाणकर, डॉ. अशोक ओळंबे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष शसंजय गाते यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा महाराष्ट्र पादाक्रांत करीत आहे. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील अकराही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे होईल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!