NAGPUR : नागपुरातील काही भागात स्वाइन फ्लूने swine flu डोके वर काढले आहे. त्यामुळे नागपूरकरांनी चिंता वाढताना दिसत आहे. कोरोनासारख्या आजारावर मात करून आताच नागपूरकर सावरले होते. अशातच आता स्वाइन फ्लूसारख्या आजाराने नागरिक चिंतेत आहेत.
उपराजधानीत दगावणाऱ्या रुग्णामध्ये अजनीतील एका 57 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. त्यांच्यावर किंग्जवे रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील मुलताईच्या 67 वर्षीय रुग्णावर मेडिट्रिना रुग्णालयात उपचार असताना तो दगावला. दोघांचा मृत्यू जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नोंदविला गेला.
ताप, सर्दी अशी लक्षणे दोघांना आढल्याने प्रथम दोन्ही रुग्णांनी स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. उपचारानंतरही दोघांची प्रकृती खालावतच गेल्याने त्यांना नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 1 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 दरम्यान नागपुरात या आजाराचे तब्बल 14 नवीन रुग्ण आढळले आहेत.
अशी आहेत लक्षणे
तज्ज्ञांच्या माहितीनुसार ‘स्वाइन फ्लू’ हा सामान्य तापासारखा असल्याने याची लक्षणे सामान्य तापासारखीच असतात. ताप 102 ते 103 डिग्री राहतो. थंडी वाजणे, कफ आणि घसादुखी होते. अंगदुखी, डोकेदुखी, खूप जास्त थकवा जाणवतो. डायरिया, उलट्या होतात. स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना न्यूमोनिया, बॅक्टेरिअल न्यूमोनिया, श्वास घेण्यास त्रास अर्थात ब्रॉन्कायटिस अशा प्रकारची गुंतागुंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधुमेह, हृदयरोग अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लागण झाल्यास जास्त गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.
कसा कराल बचाव?
संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. नियमितपणे हात धुवायला हवेत. सॅनिटायझर उपलब्ध नसल्यास साबणाचा वापर करता येतो. नियमित स्वच्छता ठेवायला हवी. शिंकताना व खोकताना नाक आणि तोंडावर रुमाल ठेवावा. संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी. संसर्ग झालेल्या व्यक्तीने गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. स्वाइन फ्लूच्या काही प्रकारांमध्ये लसीकरणाचा उपयोग होतो. त्यामुळे केमोथेरपीचे उपचार घेत असलेल्या आणि इतर आजारांचा प्रादुर्भाव असलेल्या व्यक्तीने लसीकरण घेतल्यास स्वाइन फ्लूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊ शकते.