नवी दिल्ली : मोबाईलवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आतापर्यंत स्क्रिनवर दिसायचा. आता मात्र कॉल करणाऱ्याचे नावच थेट स्क्रिनवर दिसणार आहे. येत्या दोन आठवड्यात ही सेवा सुरू होणार असल्याचे ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (ट्राय) स्पष्ट केले.
कॉल करणाऱ्याची माहिती मिळविण्यासाठी आतापर्यंत मोबाईलधारकांना ‘ट्रु कॉलर’ हे ‘थर्ड पार्टी अॅप’ वापरावे लागत होते. त्यातही मोबाईलधारकाने आपली खरी माहिती टाकली तरच त्याचे नाव स्क्रिनवर दिसायचे. परंतु आता सिमकार्ड खरेदी करताना आधारवर ग्राहकाचे जे नाव असेल तेच नाव मोबाईलच्या स्क्रिनवर दिसणार आहे. त्यामुळे कोणीही आपली ओळख लपवू शकणार नाही, असे ‘ट्राय’ने स्पष्ट केले.
काही सेल्यूलर कंपन्या आतापर्यंत ‘कॉलर आयडेंटिफिकेशन नंबर’ लपविता यावा यासाठी ग्राहकांना ‘प्रायव्हेट नंबर’ पुरवायच्या. ही सुविधा देखील ‘ट्राय’ने पूर्णपणे बंद केली आहे. देशात आता फक्त पंतप्रधानांच्या क्रमांकाला ‘प्रायव्हेट नंबर’ करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे एखादा व्यक्ती तुम्हाला कॉल करून विनाकारण त्रास देत असेल तर पोलिसांकडे तक्रार देताना त्याच्या मोबाईल क्रमांक आणि नावासह तक्रार करणे शक्य होणार आहे. यामुळे तपास करताना पोलिसांची डोकेदुखी कमी होणार आहे. ‘कॉलर आयडीवर नाव देण्यासंदर्भात आम्ही सेल्यूलर कंपन्यांच्या स्टेक होल्डर्सशी बोलत आहोत. दोन आठवड्यात ही सुविधा सुरू होण्याची दाट शक्यता आहे’, असे ‘ट्राय’च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही सुविधा सुरू झाल्यानंतर कोणीही आपले नाव लपवू शकणार नाही असे ‘ट्राय’ने स्पष्ट केले.