अकोला : जिल्हा परिषद मालकीच्या मिनी मार्केटमधील दुकाने आणि जिल्हयातील इतर मालमत्तांचे ‘स्ट्रक्चर ऑडिट’ अद्यापही मार्गी लागले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या संबंधित मालमत्तांचे स्ट्रक्चर ऑडिट होणार तरी कधी? असा सवाल जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केला. यासोबतच अतिरिक्त शिक्षकांचे ग्रामीण भागातील शाळांमध्ये रिक्त पदांवर समायोजन करण्याची मागणीही सदस्यांनी सभेत रेटून धरली.
सिव्हिल लाइनस्थित जिल्हा परिषद मिनी मार्केटमधील दुकानांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद मालकीच्या मालमत्तांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले; त्याचे काय झाले, अशी विचारणा सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ यांनी सभेत केली. जिल्हा परिषद मिनी मार्केटमधील काही दुकानांच्या भाडेकरुंनी पोटभाडेकरूदेखील ठेवल्याचा मुद्दा सदस्य गजानन पुंडकर यांनी उपस्थित केला.