Achalpur | अचलपूर : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकांनी (NIA) घातलेल्या छाप्यात एका 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. सॅम अली असे या युवकाचे नाव आहे. छाप्यामागील नेमके कारण कळलेले नाही. एनआयएचे अधिकारी सॅमची अमरावती येथील जोग क्रीडा संकुलात कसून चौकशी करीत आहेत. सॅमच्या घरातून काही साहित्य व कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
रविवारी (ता. 17) मध्यरात्री एनआयएच्या पथकाने अचलपूर गाठत सॅमच्या घरावर छापा घातला. पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती. आठ वाजताच्या सुमारास सॅमला पथकाने ताब्यात घेतले. (NIA Detained 19 Years Old Sam Ali From Achalpur Of Amravati) मध्यरात्री एनआयएच्या पथकाने छापा घातला त्यावेळी एके-47 बंदुकधारी सुमारे 300 पोलिसांचा ताफा परिसरात तैनात करण्यात आला होता. सॅमचे वडिल अहमद अली हे शिक्षक आहेत. आई शिक्षिका आहे. दोघेही जी.एन. शाळेत शिकवतात. कुटुंबातील सर्वच सदस्य सुशिक्षित आहेत. सॅम फारसा घराबाहेर जात नव्हता. त्याला खुपच कमी मित्र आहेत.
आमच्या घराची झडती व चौकशी पूर्ण झाल्यानंतर एनआयएचे पथक सकाळ आठच्या सुमारास सॅमला घेऊन रवाना झाले, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. या छाप्यासंदर्भात स्थानिक पोलिसांनाही फारशी माहिती नाही. एनआयएच्या पथकानेही कुणाला अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे सॅमला एनआयएने नेमक्या कोणत्या कारणांमुळे ताब्यात घेतले हे अस्पष्ट आहे.