अकोला : प्रवासादरम्यान प्रवाशांना रेल्वेत काही त्रास व समस्या भेडसावत होत्या. रेल्वे विभागाकडे मोठ्या प्रमाणात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने प्रवाशांना होत असलेला त्रास दूर करण्याच्या दृष्टिकोनातून काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
आता रेल्वे बोगीत मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलणे तसेच इयरफोन शिवाय गाणे, संगीत एकता येणार नाही. समूहाने प्रवास करणाऱ्यांना मोठमोठ्याने गप्पागोष्टी करण्यावर आवर घालावा लागेल. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रात्रीचे नियम असे आहेत. तिकिट तपासणीसास रात्री दहा वाजे नंतर प्रवाशांची तिकीटे तपासता येणार नाहीत, तसेच प्रवासी, नाईट लाईट व्यतिरिक्त मोठे लाईट सुरू ठेवू शकणार नाही. ऑनलाईन भोजन सेवा पुरविणाऱ्यांना रात्री दहा नंतर भोजन सेवा देता येणार नाही. झोपण्यासाठी मधल्या बर्थचा वापर रात्री दहा नंतर सकाळी सहा पर्यंतच करता येईल.
वातानुकूलितक्लासमधे प्रवास करतांना नियमानुसार 70 किलो, स्लीपर कोच मधे 40 तर द्वितीय श्रेणीत 35 किलो वजनाचे सामान सोबत नेता येते. अतिरिक्त शुल्क भरून त्यापेक्षा जास्त वजनाचे सामान नेता येऊ शकते. एखादा सहप्रवासी, लहान मुल, ज्येष्ठ किंवा दिव्यांग व्यक्ती प्लॅटफॉर्मवर राहुन गेली किंवा अपघात घडला, अशा आणीबाणीच्या परिस्थितीतच रेल्वे थांबवण्यासाठी चेन ओढता येते.
रेल्वेच्या कुठल्याही वर्गाच्या बोगीत धुम्रपान, मद्यपान करणे प्रतिबंधित असून, ज्वालाग्रही पदार्थ नेता येत नाही. या व्यतिरिक्त सर्वसामान्यांना अमान्य असलेली कुठलीही कृती करणे अपेक्षित नाही. गाडीतील तिकीट तपासणीस, केटरिंग व अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक शिष्टाचाराचे पालन करावे, तसेच शिष्टाचाराचा भंग करून सहप्रवाश्यांना त्रास होईल, अशी वागणूक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे निर्देश रेल्वे विभागाने दिले आहेत.