मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे राजकीय बंडासंदर्भातील माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाकडून मिळाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
प्रत्येक राज्याचा पोलिस दलात गुप्तचर विभाग असतो. हा विभाग राज्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगार, राजकीय पक्षातील हालचाली याबद्दल महिती गोळा करीत असतो. ही माहिती राज्याचे पोलिस महासंचालक, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक दररोज सकाळी गृह मंत्र्यांना देत असतात. गृहमंत्री या माहितीच्या आधारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतात. अगदी याच प्रकारे केंद्र सरकारचा गुप्तचर विभाग (आयबी) प्रत्येक जिल्ह्यातील माहिती गोळा करतो. रॉ आंतरराष्ट्रीय माहिती गोळा करतो. केंद्रीय गृह सचिव रोज सकाळी ही माहिती केंद्रीय गृह मंत्र्यांना देतात. गृह मंत्री ही माहिती पंतप्रधान, संरक्षण मंत्री यांना देऊन निर्णय घेतात.
महाराष्ट्रातील शिवसेना आमदार फुटणार ही माहिती राज्य गुप्तवार्ता विभागाला वेळीच मिळणे अपेक्षित होते. मात्र राज्याच्या गृहखात्याबरोबरच गुप्तचर यंत्रणांनी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे आमदार बंड पुकारुन भाजपाची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती देण्यात अपयश आले. यासंदर्भात पवारांनी उघडपणे दिलीप वळसे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
पोलिसांचे संरक्षण असणारे नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि व्हीआयपी यांच्या प्रवासाची व हालचालीची माहिती त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील अधिकाऱ्यांना वरपर्यंत कळविणे बंधनकारक असते. विशेष म्हणजे हे व्यक्ती जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असतील तर दोन्ही राज्यातील पोलिसांना ती माहिती एकमेकांना द्यावीच लागते. पवारांच्या नाराजीला महत्व यासाठी आहे कारण बंडखोर मंत्री आणि आमदारामध्ये विशेष सुरक्षा असलेले गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई सुद्धा आहेत. गृह राज्यमंत्री महाराष्ट्रातून सूरतला पोहोचेपर्यंत कुणाला कळत नसेल तर गृह विभाग राष्ट्रवादीकडे ठेवण्याचा फायदा काय, असा जाब पवारांनी दोन्ही नेत्यांना विचारला. राष्ट्रवादीने खूप विचारपूर्वक काही खाती आपल्याकडे ठेवली आहेत. त्यापैकी गृह विभाग एक आहे.