बुलडाणा : नांदुरा तालुक्याला अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आहे.शनिवारी रात्री झालेल्या पावसाने तब्बल ११६ कुटुंब निराधार झाले असून २६ घरांची पडझड झाली आहे. याशिवाय ६७ जनावरे बेपत्ता वा दगावल्याचे प्राथमिक माहिती आहे. तालुक्यातील महाळुंगी ( ८४ मिमी) व वडनेर( ८१.५ मिमी) महसूल मंडळात अतिवृष्टी ने थैमान घातले.
अतिवृष्टीमुळे हजारो ग्रामस्थांचे बेहाल झाले. माळेगाव येथील ५०, लोणवडी मधील ६० तर वडाळी मधील ६ कुटुंबे निराधार झाली आहे. अतिवृष्टीग्रस्त लोणवडी मधील १० म्हैस, ३बैल, ७ गाई , ६ गोऱ्हे तर ४१ बकऱ्या पाण्यात वाहून बेपत्ता झाल्या वा मृत्युमुखी झाल्या आहेत.
अतिवृष्टी वा पुराचे पाणी शिरल्याने खरीप पिके व भाजीपाल्याचे नुकसान झाले. रसुलपूर, महाळुंगी, पिंपळगाव धांडे, वसाडी बुद्रुक, वाडी, बाभूळगाव, खडतगाव, तिकोडी, नायगाव, माळेगाव, मुरंबा, पोटळी, लोणवडी या गावातील पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे.