Congress On Mahayuti : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी केलेले आंदोलन जवळपास संपले आहे. यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मराठा समाजाची सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने पूर्ण केलेली नाही. कोणाच्याही आरक्षणला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली की ओबीसींची असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य केली असेल तर ओबीसींची फसवणूक केलेली आहे. आरक्षणप्रकरणी सरकारची भूमिका सुस्पष्ट नाही. सरकारने फक्त एक अधिसूचना काढलेली असून त्यावर हरकती मागविल्या आहेत. सरकारने आरक्षणासंदर्भात अध्यादेश किंवा शासन निर्णय (GR) काढलेला नाही. खोटे बोलून संभ्रम निर्माण करून मराठा समाजाची फसवणूक करणे योग्य नाही. त्यामुळे सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे नाना पटोले म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्दावर प्रतिक्रिया देताना पटोले पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा दिला. सरकारने मागण्या मान्य कराव्या यासाठी लाखो समर्थकांसह त्यांना मुंबईला यावे लागले. सरकारचे प्रतिनिधी व जरांगे पाटील यांच्यात चर्चा होऊन रात्री सरकारने एक अधिसूचना काढली. सर्व मागण्या मान्य झाल्याचे जाहीर करून जरांगे पाटीलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले. ही अधिसूचना सरकार अगोदरही काढू शकले असते. त्यासाठी सरकारला एवढ्या मोठ्या आंदोलनाची वाट बघण्याची काय आवश्यकता होती? असाही प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.
ऐतिहासिक निर्णय घेतला असे मुख्यमंत्री म्हणतात. परंतु या संपूर्ण घटनाक्रमात राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार कुठेच दिसले नाहीत. मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासही दोन उपमुख्यमंत्री का गेले नाहीत? याचे आश्चर्य वाटते. ओबीसी आरक्षणाला हात लावणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले होते. मग मराठा समाजाची ओबीसीतूनच आरक्षण दिले पाहिजे, या मागणीचे काय झाले? मराठा समाजाला आरक्षण दिले का? दिले असेल तर ते कसे दिले? हे सरकारने स्पष्ट करावे, असेही नाना पटोले म्हणाले.
सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला हेच कळत नाही. संभ्रम निर्माण करून सरकार मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार फसवाफसवीचे राजकारण करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांच्या आधीही अनेक आंदोलने झालीत. मराठा समाजाने पुर्वी 58 मोर्चे शांततेत काढले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सर्वांचीच भूमिका आहे.
आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास समाजाला आरक्षण दिले पाहिजे. त्यासाठी जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटविणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाने सातत्याने आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटविण्याची मागणी केली आहे. 30 जानेवारीपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मोदी सरकारने यावर निर्णय घ्यावा म्हणजे मराठा समाजासह इतर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटतील, असे विचार नाना पटोले यांनी व्यक्त केले.