नागपूर : चोरी करण्यासाठी ते चक्क उडत यायचे… गॅस कटरच्या मदतीने एटीएम फोडायचे अन् नंतर पुन्हा भुर्रर्र उडून जायचे…. गेल्या दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पोलिसही तपास करून हैराण झाले होते. त्यांना पकडण्यासाठी नागपूर पोलिसांनी सापळा रचला आणि मग जाळ्यात अडकले दोन चोरटे… गुरमित ऊर्फ समरज्योतसिंह आणि दुखदेवसिंह पूरणसिंह ही त्या दोघांची नावं. एक ३६ वर्षाचा आहे तर दुसरा २३ वर्षांचा. दोघेही पंजाबचे मूळ रहिवासी आहेत.
काही दिवसांपूर्वी नागपुरात गॅस कटरच्या सहाय्याने एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. ऐनवेळी धुर निघाल्यानं चोरटे पसार झालेत, पण पळताना पोलिसांची झोप उडवून गेले. चक्क एटीएम फोडण्याचाच प्रयत्न झाल्यानं नागपुरातील जरीपटका पोलिसांनी डोळ्या तेल घालुन तपास सुरू केला. पुरावे सापडत गेले, सीसीटीव्हीचे फुटेज मिळत गेले आणि चोरटे गळाला लागले. जरीपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे चोरटे चोरी करण्यासाठी चक्क विमान प्रवास करून नागपुरात आले होते. पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर चोरटे कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पसार झाले. विमानाने आधी दिल्लीला आणि नंतर पंजाबला पळाले. त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनीही लागलीच पंजाब गाठले. तब्बल १० दिवस पाळत ठेवल्यानंतर आणि पाठलाग केल्यानंतर चोरटे पोलिसांच्या हाती लागले. त्यातही जुगाद नावाचा एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.
पंजाबमधल्या चोरट्यांना विमानाने येऊन नागपुरात एटीएम फोडण्याची गरज का भासली हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी जरीपटका पोलिस तपास करीत आहे. ही मोठी टोळी तर नाही ना? किंवा त्यांचा अन्य साखळी गुन्ह्यांमध्ये सहभाग तर नाही ना, याचा शोध जरीपटका पोलिस घेत आहेत.