नागपूर : अमरनाथ यात्रेप्रमाणे अवघड मानली जाणारी विदर्भातील नागद्वार स्वामी यात्रा प्रारंभ झाली आहे. कोविडमुळे तब्बल अडीच वर्षांनंतर ही यात्रा होत आहे.
कैलास पर्वतानंतर पचमढी तेथे महादेवाचे दुसरे मोठे स्थान आहे. नागद्वार येथून नागलोकाचा मार्ग किंवा नागद्वार म्हणून त्याला ओळख आहे. डोंगरदरी, कपारीतून व नदीतून हा प्रवास पूर्ण करीत गोविंदगिरी पहाडावर असलेल्या एका गुहेत शिवलिंगाचे भाविक दर्शन घेतात. संत गोविंदराव शिरपूरकर यांनी अनेक वर्ष या शिवलिंगाचे पूजन केले, त्यामुळे या पहाडाला गोविंदगिरी नाव पडल्याचे सांगण्यात येते. आता ही परंपरा त्यांचे वंशज यादवराव शिरपूरकर चालवित आहेत.
यात्रा काळात जंगलातून जाताना भाविकांना आधार असतो तो येथील कोरकू आदिवासी बांधवांचा. नागमोडी वळण असलेल्या मार्गांवरून नागद्वार शिवलिंगापर्यंत पोहोचावे लागते. येथे दर्शन, पूजनाने कालसर्प दोष नाहीसे होतात असे मानले जाते. पहाडावर 35 फुटाची गुफा आहे. 30 किलोमीटर पायी चालत भाविक येथे पोहोचतात. ही यात्रा पूर्ण करायला कमीत कमी तीन दिवस लागतात. येथील शिवलिंगाला काजळ लावण्याची परंपरा आहे. यात्रेच्या वाटेत कालाझाड, पडमशेष द्वार, पश्चिम द्वार, चिंतामणी, चित्रशाळा, गुप्तगंगा, निशाण गढ, जलगली ही स्थाने लागतात.
श्रावण महिन्याय वरून पाऊस, चिखलमय आणि पाय घसरणारी वाट, उंच चढाई, डोंगर, दरी, नदी अशा परिस्थितीत भाविक प्रवास करतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवर हे स्थान आहे. कोविडनंतर सुमारे पाच लाख भाविक यात्रेत येतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.