Home » गडचिरोलीत २० दिवसांत कुटुंबातील पाच जणांचा रहस्यमयी मृत्यू

गडचिरोलीत २० दिवसांत कुटुंबातील पाच जणांचा रहस्यमयी मृत्यू

by नवस्वराज
0 comment

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागाव येथे २० दिवसांत पाच जणांच्या गूढ मृत्यूसत्राने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चार आणि मावशी असे पाच जणांच्या लागोपाठ झालेल्या गूढ मृत्यूने अहेरी तालुका हादरला आहे.

येथे २४ तासांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर ८ ऑक्टोबरला विवाहित मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर १४ ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर १५ ऑक्टोबरला सकाळी मुलानेही अखेरचा श्वास घेतला. सर्व जणांनी चंद्रपूर व नागपूर येथे उपचारादरम्यान प्राण सोडले. महागाव येथे २२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यानंतर विजया शंकर कुंभारे (वय ४५) यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व थकवा जाणवू लागल्याने स्वत:च्या कारमधून पती शंकर तिरूजी कुंभारे (५२) यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. तेथे गेल्यावर त्यांनाही अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तेही उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती झाले. प्रकृती अधिक बिघडल्याने दोघांना नागपूरला हलविले. पण उपचारादरम्यान २६ सप्टेंबर रोजी शंकर तर २७ सप्टेंबर रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली.

आई-वडिलांची प्रकृती बिघडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (वय २९, रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी होती. तिचीही प्रकृती खालावली. तीन दिवस चंद्रपूर येथे उपचार केले. त्यानंतर तिची सुटी झाली. मात्र, पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने अहेरी येथे ग्रामीण रुग्णालयात भरती केले. पण प्रकृती अधिक खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले.

शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (वय २८) हा सिरोंचा येथे पोस्ट मास्तर पदावर कार्यरत आहे. आई – वडिलांच्या निधनानंतर गावी आल्यावर त्याचीही प्रकृती खालावली होती. चंद्रपूर येथे उपचारानंतर त्यास नागपूरला खासगी दवाखान्यात हलविले होते. १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याची मावशी आनंदा उराडे (वय ५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) या अंत्यविधीसाठी महागावला आल्या होत्या. ती देखील आजारी पडली. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. या मृत्यूसत्रामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून हे गूढ उकळण्याचे पोलीस आणि आरोग्य विभागासमोर आव्हान आहे. विशेष म्हणजे रोशनच्या आई – वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी (वय २८, रा.महागाव ) याचीही प्रकृती खालावली असून त्याच्यावरही उपचार सुरु आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!