Home » अमरावती पदवीधर निवडणुकीत धीरज लिंगाडे विजयी

अमरावती पदवीधर निवडणुकीत धीरज लिंगाडे विजयी

by नवस्वराज
0 comment

अमरावती : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील चुरसपूर्ण लढत संपुष्टात आली आहे. प्रथम पसंती आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांची गणना केल्यानंतर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. भाजपचे डॉ. रणजित पाटील यांचा त्यांनी पराभव केला.

मतदानाचा घसरलेला टक्का अन् अवैध ठरलेली मते याचा मोठा फटका भाजपच्या डॉ. रणजित पाटील यांना बसला. पक्षांतर्गत कलहाचा त्याही पेक्षा जास्त मोठा फटका डॉ. पाटील यांना सहन करावा लागला आहे. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे नवीन चेहरा म्हणून मतदारांपुढे आले होते. मात्र ‘जुनी पेन्शन’ कायम करण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या विधानामुळेही भाजपला सर्वत्र मोठा धक्का बसला आहे. अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. २ लाख ६ हजार १७२ मतदार या मतदार संघात आहेत. पैकी १ लाख २ हजार ४०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल ८ हजार ३८७ मते अवैध ठरली.

मतांचा कोटा ४७ हजार १०१ होता. तो कुणीही गाठु शकले नाही. मतांचा कोटा कुणीही पूर्ण करू शकलं नसल्यामुळे ज्यांना जास्त मते त्यांना विजयी घोषित  केले. यात धीरज लिंगाडे यांनी बाजी मारली. ही लढत अत्यंत काट्याची टक्कर ठरली. धीरज लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मते मिळाली. डॉ. पाटील यांना ४२ हजार ९६२ मत मिळाली. लिंगाडेंनी ३ हजार ३८२ मतांनी आघाडी घेत बाजी मारली. रिंगणात असलेल्या ईतर उमेदवारांनी मते घेतल्याने लिंगाडे व पाटील दोघांनाही काही अंशी मते कमी पडली. मतमोजणीसाठी २८ टेबलांची व्‍यवस्‍था आणि २८ पथकांची नियुक्‍ती होती. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत रणजित पाटील यांचे नाव मतपत्रिकेवर दुसऱ्या क्रमांकावर होते. बहुतांश मतदारांनी फक्त त्यांच्या नावापुढे दोनचा आकडा लिहिला होता. बाकी मतपत्रिकेत कुठेही एकचा आकडा लिहिलेला नव्हता. त्यामुळे सुमारे ६ हजार पेक्षा अधिक मते सरळ निवडणुकीतून अवैध ठरली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!