Yavatmal | Amravati : खुनाच्या दोन घटनांमुळे पश्चिम विदर्भातील अमरावती आणि यवतमाळ हे दोन जिल्हे बुधवारी (ता. 20) हादरले. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील तिरघडा येथे पत्नीवरील संशयातून जावयाने पत्नीसह सासरच्या चौघांची हत्या केली. कोंबड्यांच्या वादातून एकाने शेजारी राहणाऱ्या तीन जणांचा खून केल्याचा प्रकार अमरावतीच्या दर्यापूरजवळ असलेल्या नाचोना खुर्दाबाद येथे घडला.
कळंब तालुक्यातील तिरझडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांची सामूहिक हत्या करण्यात आली. मारेकरी गोविंद विरचंद पवार हा त्यांचा जावई आहे. पंडित भोसले, सुनील पंडित भोसले, ज्ञानेश्वर पंडित भोसले, रेखा गोविंदा पवार अशी मृतांची नावे आहेत. रुखमा पंडित भोसले या जखमी आहेत. गोविंद विरचंद पवार याने त्यांची हत्या केली. भोसले हे पारधी बेड्यावर वास्तव्यास होते.
गोविंदला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, असे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूषष जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कळंब पोलिस ठाण्याच्या निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
दोन शेजाऱ्यांमध्ये कोंबड्या दारात आल्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपा गेला. त्यातील एकाने तलवार, कुऱ्हाडीने वार करीत व त्यानंतर सहा जणांच्या अंगावर कार चढवित तिघांची हत्या केली. तीन जण या घटनेत जखमी झालेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर जवळ असलेल्या नाचोना खुर्दाबाद गावात ही घटना घडली. अनूसया अंभोरे, श्याम अंभोरे, अनारकली गुजर ही मृतकांची नावे आहेत. शारदा अंभोरे, उमेश अंभोरे, किशोर अंभोरे हे घटनेत गंभीर जखमी झालेत.
अंभोरे कुटुंबाच्या शेजारीच राहणाऱ्या चंदन गुजर हा घटनेतील मारेकरी आहे. घटनेनंतर तो फरार आहे. गुजर कुटुंबातील सदस्य रात्री जेवण आटोपल्यानंतर घरापुढे गप्पा करीत बसले होते. त्यावेळी चंदन गुजर यांच्या घरातील कोंबड्या अंभोरे यांच्या घरात शिरल्या. त्यावरून गुजर व अंभोरे परिवारात वाद झाला.