चंद्रपूर/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळु धानोरकर यांचे दिल्लीतील वेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यामुळे धानोरकर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे २०२३ रोजी धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले.
आतड्याची गुंतागुंत वाढल्याने व पोटात इन्फेक्शन झाल्याने खासदार धानोरकर यांना सुरुवातीला नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती बिघडल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीतील वेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. खासदार धानोरकर यांनी वयाच्या ४७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वरोरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाळु धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. २०१९ ला मोदी लाटेतही लोकसभा निवडणुकीत धानोरकर हे काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभवाचा धक्का देत चंद्रपूर मतदारसंघातून खासदार झाले होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. २०१४ ते २०१९ दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता.