Mumbai : लोकसभा निवडणुकीची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते. या दृष्टिकोनातून सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. महाविकास आणि महायुती आघाडीत एकमेकांवर कुरघोडी करणे सुरू आहे. या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे विविध मतदारसंघांचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांचा कल जाणून घेत आहेत. यातच राज ठाकरे यांनी ईव्हीएम (EVM) मशीनबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जगभरातील पुढारलेल्या देशांमध्ये मतदान पत्रिकेवर शिक्का मारून मतदान होते आहे. तर मग आपणच का व्होटिंग मशीनचा हट्ट धरून बसलो आहोत? मशीनचे बटण दाबल्यावर मतदान झाले आहे की, नाही हे कळत नाही. फक्त एक छोटासा आवाज येतो. यापलीकडे काही समजत नाही. मी ज्याला मतदान केले आहे, त्याला ते मिळाले का? ठाकरे पुढे म्हणाले कि, मध्यंतरी मतदान झाल्यानंतर मशीन मधून स्लीप येणार असे कळले होते. परंतु तसे झाले नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले…
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिले. फडणवीस म्हणाले याआधी त्यांना ईव्हीएम पटले होते, आता पटत नाही, पुन्हा पटेल. यावरून त्यांनी काँग्रेसच्या राजवटीत ईव्हीएम कसे चालत होते असा प्रश्न उपस्थित केला.