मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून मनसे आक्रमक झाली आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा 18 नोव्हेंबर 2022 रोजी बुलडाण्यात येणार आहे. या ठिकाणी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना जमा होण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. ‘शेगावला जा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवा, असे राज यांनी जाहीर केले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचे आमंत्रण दिले. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असे म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केली
उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधींच्या विधानाला असहमती दर्शवली आहे. सावरकरांचे देशासाठीचं योगदान अमूल्य आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.