अकोला : प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा, माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडु यांच्या अपघाताबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केला आहे. आमदार कडु यांचा दुचाकीने अपघात होऊच कसा शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कडु यांच्या अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी आमदार मिटकरी यांनी केली आहे.
आमचे राजकीय मतभेद असले, तरी आमदार कडु यांचे दिव्यांगासाठीचे काम स्तुत्य असल्याचे मिटकरी म्हणाले. सरकारमध्ये असतानाही सरकारच्या विरोधात कडु बोलतात. अशात सत्ताधारी आमदाराला एक व्यक्ती दुचाकीवर येऊन उडवतो अन् त्यातून गंभीर दुखापत होते ही बाब मनाला न पटणारी असल्याचे मिटकरी म्हणाले. घडलेल्या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणीही मिटकरी यांनी केली.
कडु यांना गंभीर दुखावत
दुचाकीच्या अपघातात कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठी दुखापत झाले आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना हा अपघात घडला होता. सध्या कडु यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. बच्चू कडु यांची प्रकृती दुपारी अचानक कशी खालावली, असा सवालही आमदार मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.