मुंबई : महाराष्ट्रातील सर्वाधिक धुळीचे शहर अकोला असल्याचे खेदाने नमूद करावे लागत असल्याचे सांगत आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत अकोल्यातील कचऱ्याचा मुद्दा उचलला.
अकोला महानगरातील नायगाव येथे कचरा टाकण्यात येतो. नायगावातील कचरा प्रकल्पाबाबत देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अकोल्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. आमदार मिटकरी हे या मुद्द्यावर बोलत असताना आमदार डॉ. रणजित पाटील यांनी मध्यस्थी केल्याने आमदार मिटकरी यांनी अकोला महापालिकेत आपली सत्ता असल्याने प्रश्न विचारायचा नाही का असा प्रतिप्रश्न केला.
मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर देताना सांगितले की अकोला येथील प्रकल्पाबाबतची माहिती योग्य असल्याचे सांगितले. अकोल्यातील प्रदूषण व कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुरेसा निधी देण्यात आला आहे. पावसाळा संपताच सहा महिन्यात अकोल्यातील बायोमायनिंगचा प्रकल्प पूर्ण केला जाईल.
आमदार मिटकरी यांना उत्तर देताना डॉ. रणजित पाटील म्हणाले की मिटकरी यांनी प्रश्न विचारताना मुद्दाम एका विशिष्ट समाजाचा उल्लेख केला. वास्तविकपणे अकोल्यातील कचऱ्याच्या मुद्द्यावर गंभीर कार्यवाही करणे गरजेचे आहे. अकोल्यातील कचऱ्याला सातत्याने आग लागत आहे, असे त्यांनी लक्षात आणून दिले. मंत्री देसाई यांनी यासंदर्भात आजच्या आज महापालिका आयुक्तांना आदेश देण्यात येतील असे सांगितले.