Sanjay Gayakwad : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवारी (ता. 28) लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. अर्ज दाखल करताना गायकवाड यांच्यासोबत बुलढाणा शिवसेना तालुकाध्यक्ष धनंजय बारोटे, शहराध्यक्ष गजेंद्र दांडे आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अचानक घडलेल्या राजकीय नाट्यानंतर प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड यांनी अर्ज का भरला माहिती नाही. कदाचित त्यांना एबी फॉर्म मिळाला असावा, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया जाधव यांनी दिली. दाखल केलेला अर्ज हा मागे घेण्यासाठी नसतो असेही यावेळी गायकवाड म्हणाले.
दोन अर्ज केले दाखल
आमदार गायकवाड यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एक अर्ज शिवसेना पक्षाकडून आहे. दुसरा अर्ज हा अपक्ष म्हणून भरलेला आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी संजय गायकवाड यांनी दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. बुलढाणा लोकसभेत महायुतीचा उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नसताना आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी अर्ज भरल्याचे आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे.
शिंदे यांनी फोन करताच..
आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आमदार संजय गायकवाड यांना आला. शिंदे यांनी विचारणा केली की, अर्ज दाखल केला आहे का? यावर आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की, आपण एकनाथ शिंदे यांच्या शब्दाबाहेर नाही. मरणार पण एकनाथ शिंदे यांच्यापुढे जाणार नाही. अर्ज मागे घेण्याची तारीख कधी आहे? असे विचारले असता गायकवाड यांनी सांगितले की, 4 एप्रिल ही तारीख आहे. उलट आपण प्रतापराव जाधव यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे काळजी करू नका, असे गायकवाड यांनी शिंदे यांना सांगितले.