अकोला : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या चौकशीला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थातच ‘एसीबी’ने सुरुवात केली आहे. कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवित आमदार देशमुख कपड्यांच्या बॅगसहच एसीबीच्या कार्यालयात पोहोचले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीनंतर आमदार देशमुख गुवाहटीतून सुटून आले होते.
सध्या आमदार देशमुख यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुली चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. बयाण नोंदविण्यासाठी त्यांना अमरावती येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. आपल्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते त्यामुळे गैरसोय नको म्हणून कपड्यांची बॅग भरूनच निघत असल्याचे देशमुख यांनी ‘नवस्वराज’ला सांगितले. सूरतला गेलो त्यावेळी कपडेही नव्हते. एकाच ड्रेसवर सुटका करून अकोल्यात परतावे लागले होते, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले.
कापडाची पिशवी, औक्षण आणि शक्तीप्रदर्शन
बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख अमरावतीच्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी जाताना आपल्यासोबत कापडाची पिशवी घेऊन गेले आहेत. त्यात त्यांचे कपडे व नित्योपयोगी साहित्य आहे. आपल्याला अटक होणारच आहे असे ते सांगत आहेत. पतीची सुटका व्हावी म्हणून देशमुख यांच्या पत्नीने त्यांना घरातून निघण्यापूर्वी औक्षण केले. घरातून निघाल्यानंतर शक्तीप्रदर्शन करीत देशमुख अमरावतीच्या दिशेने रवाना झाले.
काय आहे प्रकरण?
नितीन देशमुख यांच्यावर बेहिशेबी संपत्ती असल्याची तक्रार काही महिन्याधी करण्यात आली होती. नितीन देशमुख यांच्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र अमरावती येथे सुरू आहे. त्यांना जबाब नोंदविण्याकरिता नोटीस बजावण्यात आली आहे.