मुंबई : मागेल त्याला सिंचन विहिर या योजनेतून अकोला जिल्ह्यात विहिर करणाऱ्या लाभार्थ्यांना आठ वर्षांनंतरही रक्कम देण्यात आली नसल्याचा मुद्दा बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी विधान सभेत मांडला.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी गुरुवार, २५ ऑगस्ट २०२२ रोजी औचित्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यावेळी आमदार देशमुख यांनी हा मुद्दा लाऊन धरला. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर विहिरीचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना थकित रक्कम व्याजासह देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
गटविकास अधिकारी अनेक कारण पुढे करीत शेतकऱ्यांचे पैसे देत नसल्याकडे आमदार देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने यासंदर्भात शासन आदेश काढला होता. त्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळत नसतील तर आत्महत्यांचे प्रमाण वाढणार नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.