अकोला : विविध कार्यक्रमांसाठी येत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या ‘बॅनर’वरून महायुती सरकारचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार पदाधिकाऱ्यांचा फोटो नसल्याने आमदार अमोल मिटकरी यांनी हा भाजपचा प्रचाराचा कार्यक्रम आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
बॅनरवर केवळ भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे फोटोच लावण्यात आले आहेत. ही जाहिरात सरकारी खर्चातून करण्यात आली असेल तर याची चौकशी करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अकोल्यात आरोग्य विभागाच्या विविध रुग्णालयाचा लोकार्पण कार्यक्रमांसह दोन दिवसीय आरोग्य महामेळावा होत आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले आहेत. हा कार्यक्रम म्हणजे भाजपचा प्रचार कार्यक्रम असल्याची टीका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते, आमदार अमोल मिटकरींनी केली आहे. आरोग्य विभागाच्या कार्यकर्मासाठी अकोला शहर आणि जिल्हाभरात पोस्टर आणि बॅनर्स लागले आहेत. यावर कोणत्याही वैधानिक पदावर नसलेल्या भाजप नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे फोटो लागले आहे. दरम्यान, सत्ताधारी अजित पवार गटासोबतच विरोधी शिवसेना ठाकरे गटानेही या प्रकाराचा विरोध केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये सहभागी असेल तर जिल्ह्यातील भाजप नेत्यांना याचे ज्ञान नाही का. बॅनरवर महाराष्ट्र शासनाचा ‘सिम्बॉल’ आहे. माजी महापौर यांच्या फोटोसह अन्य सदस्यांचे फोटो लावत असाल आणि भाजपचे बॅनर असेल तर आमचे म्हणणे नाही. परंतु सरकारी खर्चातून ही होर्डिंग्ज बाजी आहे का याचं पालकमंत्री यांनी अवलोकन करावं. आम्ही सत्तेतील घटक पक्ष आहोत तर राष्ट्रवादीच्या आमदाराचा फोटो या होर्डिंग्जवर का नाही असा प्रश्न उपस्थित करीत आमदार मिटकरी यांनी खेद व्यक्त केला.
आमदार देशमुखांचा बहिष्कार
सरकारच्या पैशांची भाजपने स्वत:च्या प्रचारासाठी उधळपट्टी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी केला. हा कार्यक्रम म्हणजे भाजपची प्रचार सभाच असल्याने कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचं आमदार नितीन देशमुखांनी स्पष्ट केलं