मुंबई : चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नाबाबत विधान सभेत झालेल्या चर्चेदरम्यान गोंधळ झाल्याने चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार संतापले. विदर्भाच्या लक्षवेधींवर बोलू दिले जात नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
दुपारी दीड वाजताच्या सुमारास विधान सभेत पांदण रस्त्यांचा मुद्दा सुरू होता. या मुद्द्यावरील चर्चा आटोपल्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना लक्षवेधी मांडण्यासाठी आवाहन केले. या लक्षवेधीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तोकडे उत्तर दिल्याने आमदार जोरगेवार संतापले. त्यानंतर काँग्रेसचे आमदार नाना पटोले, देवराव होळी, माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनीही आक्रमक भूमिका घेतली.
औषधी खरेदीचा मुद्दा असेल, कर्मचाऱ्यांची तुटपुंजी संख्या आदी अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी एक दिवसापूर्वीच या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेतल्याची माहिती दिली. चंद्रपूरसह राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील आरोग्य विषयक समस्या सोडविण्यात येतील, असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.