अकोला : अकोला जिल्ह्यातील सांगोळा नावाच्या गावी रावणाची सद्गुणांमुळे पूजा केली जाते. या प्रथेला तब्बल २१० वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे. आजही अनेक भागात रावणाला देव मानले जाते. अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सांगोळा येथील रावणाच्या मंदिरात सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले आहेत. रावण दहन परंपरेला त्यांनी विरोध केला.
रावणात अनेक दुर्गुण होते, पण काही चांगले गुणही होते. याच गुणांमुळे अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावण दहनऐवजी पूजा केली जाते. काही भागात आदिवासी बांधवांमध्ये देखील रावणाला देव मानतात. दरम्यान, विजयादशमीला होणाऱ्या रावण दहन परंपरेला आमदार अमोल मिटकरी यांनी विरोध दर्शवला होता. रावण हा राक्षसांचा राजा होता, असे पुस्तकात आहे. अनेक ठिकाणी रावणाची मंदिरे आहेत. आदिवासी लोक रावणाची मनोभावे पूजा करतात. रावण चरित्र्य, प्रखांड पंडित, शिवभक्त आणि अभ्यासू होता, असे मिटकरींनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात रावण दहनाविरोधात शासन निर्णय व्हावा, यासाठी भूमिका मांडणार आहे आदिवासी समाजाच्या दैवताचा अपमान हा एकप्रकारे आदिवासी समाजाचा अपमान आहे. त्यामुळे या प्रथेला कायम निर्बंध घातले पाहिजे. महाराष्ट्रातील एकमेव मंदिर अकोला जिल्ह्यात आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.