अकोला | Akola : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने निवेदन दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाचा तिरंगा आणि संविधान नाकारत आली आहे. संघाने हिंदूराष्ट्राचा हट्ट सोडत संविधानानुसार देश घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून केली आहे. (Memorandum to RSS Chief Mohan Bhagwat by Vanchit Bahujan Aaghadi at Akola)
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, विभागीय अध्यक्ष बालमुकुंड भीरड, पश्चिम अकोलाचे कार्याध्यक्ष मजहर खान, महासचिव गजानन गवई, जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, अॅड. संतोष राहटे, पूर्व अकोलाचे अध्यक्ष शंकर इंगळे, आदिवासी समाजाच्या नासरी चव्हाण यांनी हे निवदेन दिले. डॉ. भागवत यांची प्रत्यक्ष निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे आरएसस प्रमुखांचे स्वीय सहाय्यक बिडवे यांना हे निवेदन देण्यात आले, असे वंचितचे डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले.
देशात बहुजन, अल्पसंख्यक, आदिवासी, मराठा, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त समाजात संघर्ष निर्माण होत आहेत. संघ हिंदू राष्ट्राची पाठराखण करतो आणि भाजपला समर्थन देतो. त्यामुळे भाजपने देशात जातीय राजकारण सुरू केले आहे. संघाने यासंदर्भात हस्तक्षेप करावा. भाजपला अराजकता, जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रकार थांबविण्यास सांगावे. संघानेही हिंदूराष्ट्रापेक्षा संविधानात नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्न करावे, असे वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.