बुलढाणा : उद्धव ठाकरे यांचा पूर्ण गट रिकामा होईल, असा दावा शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. ठाकरे यांच्या गटातील उरलेल्या १५ आमदारांपैकी आठ आमदार शिंदे गटात येतील, असे जाधव म्हणाले.
प्रतापराव जाधव म्हणाले, “अजूनही ठाकरे गटातील खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत, पण त्यांच्या स्थानिक पातळीवरील काही वैयक्तिक अडचणी आहेत. ते नेतृत्वावर प्रेम आहे, म्हणून ठाकरे गटात थांबलेले नाहीत. त्यांच्या जिल्ह्यात स्थानिक पातळीवरचे व्यक्तिगत प्रश्न असल्याने ते तिकडे थांबले आहेत.” एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे प्रणित शिवसेना जवळपास रिकामी झाली आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी दवा केल्याप्रमाणे आणखी खासदार बाहेर पडल्यास उद्धव ठाकरे यांना तो जबरदस्त धक्का ठरू शकतो.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे नेते बाहेर पडल्यामुळे पक्षाला झालेले नुकसान नियंत्रित करण्यासाठी युवा सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. अशात खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडून पुन्हा पुन्हा केला जाणारा दावा म्हणजे, मोठ्या धोक्याचा इशारा मानला जात आहे. “शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात आले. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसं त्यांचं घर रिकामं झालेलं दिसेल. तसेच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना मजबुतीने पुढे येईल,” असे जाधव म्हणाले.