नागपूर : अजित पवारांकडे सद्यःस्थितीत ३२ आमदार असल्याचे सांगितले जाते. हा आकडा खरा मानल्यास शरद पवारांकडे २१ आमदार राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत शरद पवारांनी नव्याने पक्षाची बांधणी सुरू केली आहे. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना शरद पवारांनी जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्यावर विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपुरात परत आल्यानंतर देशमुख कामाला लागले आहेत. परवा (ता. १३), काल त्यांचा मतदारसंघ काटोल आणि आज ते अमरावती आणि अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील दिशा ठरवली जात आहे.
वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत देशमुख बैठका घेत आहेत. संघटनेच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अमरावती जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी ताकद होती. सर्व जुन्या सहकाऱ्यांना एकत्रित करण्याची जबाबदारी पवारांनी अनिल देशमुख यांच्यावर दिली असल्याचे समजते. २०१९च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते पक्ष सोडून गेले होते. तेव्हासुद्धा शरद पवारांनी एकट्यानेच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यानंतरचे निकाल जनतेने बघितले की, केवळ ५३ आमदारच निवडून नाही आणले, तर महाविकास आघाडीचा प्रयोग करून सत्ताही काबीज केली. त्यामुळे आगामी निवडणुकीतही शरद पवारांचाच बोलबाला असेल, असे आमदार देशमुख यांनी सांगितले.