Mumbai: राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू होणार आहे. याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमधून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यावेळी मराठा आंदोलकांवर लाठीमार झाला होता. या लाठीमारानंतर मराठा आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. परिणामी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठी ताकद प्राप्त झाली होती. तेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा झाले होते. मध्यंतरीच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी दोनवेळा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण केले होते. मात्र, त्यावेळी राज्य सरकारने जरांगे यांची समजूत काढण्यात यश मिळवले होते. राज्य सरकारला दिलेली डेडलाइन संपल्यानंतर काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलकांनी जालना ते नवी मुंबई असा लाँग मार्च केला होता. मराठा आंदोलक पायी चालत मुंबईच्या वेशीवर पोहोचले होते. यावेळी मनोज जरांगे यांना ठिकठिकाणी मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद लाभला होता.