अकोला : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर राज्य आणि केंद्र सरकारला हलवून टाकणारे मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेतल्यानंतर जालना येथील इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथील गावकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटल्यानंतर महिलांचे ठिय्या आंदोलन, निदर्शने, नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन, गावकऱ्यांचे मुंडण आंदोलन तसेच राजकीय नेत्यांना विदर्भातील पहिली गावबंदी चरणगावात करण्यात आल्यामुळे गाव एकदम प्रकाश झोतात आले.
भेटीदरम्यान गावकऱ्यांनी जरांगे पाटलांना चरणगावात सभा घेण्याविषयी निमंत्रण दिले, जे त्यांनी स्वीकारले. आंदोलनात गावकरी धडाडीने सहभागी झाल्यामुळे चरणगावाबद्दल विशेष आस्था व प्रेम आहे. त्यामुळे प्रकृती ठिक झाल्यावर विदर्भातील पहिली सभा आपण चरणगावात घेऊ, असे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी गावकऱ्यांना दिले आहे.