Home » नोकरीसाठी स्वत:च्या अंगठ्याची त्वचा कापून लावली मित्राच्या अंगठ्याला

नोकरीसाठी स्वत:च्या अंगठ्याची त्वचा कापून लावली मित्राच्या अंगठ्याला

by नवस्वराज
0 comment

बडोदा (गुजरात) : भारतीय रेल्वे विभागाच्या परीक्षेत गैरप्रकाराचा अजब नमुना समोर आला आहे. बडोद्यात एकाने परीक्षेत गैरप्रकार करण्यासाठी आपल्या अंगठ्याची त्वचा कापत मित्राच्या अंगठ्याला लावली. ही त्वचा अंगठ्यावर लाऊन घेत एकाने आपल्या मित्रासाठी परीक्षा दिली.

बडोद्याच्या लक्ष्मीपुरा भागात तोतया उमेदवार खऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा देताना आढळला. परीक्षा देण्यासाठी त्याने खऱ्या उमेदवाराच्या अंगठ्याची त्वचाच स्वत:च्या अंगठ्यावर चिटकवली होती. डिंकाच्या मदतीने त्याने मित्राच्या अंगठ्याची त्वचा स्वत:च्या अंगठ्यावर बसविली. गुजरात पोलिसांनी खऱ्या आणि तोतया उमेदवाराला अटक केली. दोघेही मूळचे बिहारचे रहिवासी आहेत.

पोलिसांनी सांगितले की, खऱ्या उमेदवाराने एका हॉट प्लेटवर त्याचा अंगठा ठेवला आणि त्वचा बाहेर काढली. नंतर त्याने ती त्वचा तोतया उमेदवाराच्या अंगठ्यावरील त्वचेवर चिटकवली. त्यानंतर तोतया उमेदवार परीक्षा केंद्रावर गेला. परीक्षा केंद्रावर फवारलेल्या हॅन्ड सॅनिटायझरमुळे या प्रकाराचे बिंग फुटले. तोतया उमेवाराने हातावर सॅनिटायझर घेताच चिटकवलेली त्वचा अंगठ्यावरून निघाली. त्यानंतर परीक्षा पर्यवेक्षकांनी उमेदवारांचे ‘थम पंचिंग’ घेतले व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तोतया उमेदवाराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हा प्रकार सांगितला.

डीएनए व फॉरेन्सिक चाचणीही
पोलिसांनी प्रकरणाचा तपास करण्यासाठी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची डीएनए चाचणी केली. याशिवाय अंगठ्यांच्या त्वचेचे फॉरेन्सिक अहवालही मागविले आहे. भारतीय रेल्वेच्यावतीने टीसीएम कंपनी ही परीक्षा घेत होती. परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून कंपनीने उमेदवारांची उपस्थिती व सत्यता ‘थम पंचिंग’ने करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान अखिलेंद्र सिंग यांनी ‘स्कॅनिंग डिव्हाईस’च्या मदतीने हा गैरप्रकार पकडला. सिंग यांनी परीक्षा केंद्रात मनीषकुमार शंभूप्रसाद याला तोतया उमेदवार म्हणून पकडले. मनीष राज्यगुरू गुप्ताच्या जागी परीक्षा देत होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!