अकोला : केंद्र शासनाच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत. अकोला परिमंडळात नवीन मीटर बसवण्याचा कंत्राट ‘जिनस’ कंपनीला देण्यात आला आहे. कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अकोला येथे आढावा घेतला असून लवकरच मीटर बसवण्याच्या मोहिमेस सुरूवात होईल. नवीन वीज पुरवठा घेणाऱ्या ग्राहकांना, मीटर प्राथमिकतेने बसवण्यात येतील.
वीज ग्राहकांचे सद्य:स्थितीत असलेले आंतरिक इलेक्ट्रिक फिटिंग आणि नवीन स्मार्ट प्रीपेड मीटरचा ताळमेळ बसेल अथवा नाही? फिटिंग मध्ये काही फेरबदल करण्याची आवश्यकता आहे का? मोठ्या शहरांमध्ये भूमिगत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, आपल्याकडे ओव्हरहेड आहेत याचा देखील फरक पडू शकतो. स्मार्ट मीटरसाठी विद्युत दाब योग्य असणे आवश्यक आहे. कमी अथवा जास्त झाल्यास ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मत आहे.
मीटरची गॅरेंटी किती वर्षाची आहे तसेच या कालावधीत मीटर मध्ये काही दोष निर्माण झाल्यास ग्राहकास मीटर बदलवण्यासाठी पैसे भरावे लागतील का कारण कंपनीतर्फे कुठलाही नियम नसताना ग्राहकांना बाहेरून मीटर खरेदी करण्याबाबत सांगण्यात येते. या सर्व बाबींचा कंपनीने मीटर लावण्याआधी जाहीरपणे खुलासा करावा, जेणेकरून संभ्रम दूर होईल अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अकोलाचे वीज ग्राहक संघ प्रमुख मंजित देशमुख यांनी केली असल्याचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड व देवानंद गहिले यांनी कळवले आहे.