मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिस पब्लिक कमिशन स्थापन करण्याचा सरकार विचार करीत असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवार, २२ ऑगस्ट २०२२ रोजी विधान परिषदेत केली. शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राज्यात अनेक पदे रिक्त आहेत. या पदांवर नियुक्तीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. परंतु ही पदे भरताना सध्या अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर ताण देण्यापेक्षा स्वतंत्र नियुक्ती आयोग स्थापन करण्याच्या हालचाली सरकारमध्ये सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच शसकीय पातळीवर या आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.