नागपूर : लव्ह जिहादची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. दिल्लीत श्रद्धा वालकर खून प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रात त्याविरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक राज्यांनी लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातही त्याची अंमलबजावणी केली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातही याविरोधात कायदा करण्याची मागणी होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीवर माहिती दिली आहे.
नागपूर विमानतळावर फडणवीस यांच्याशी संवाद साधताना पत्रकारांनी लव्ह जिहादबाबत प्रश्न केला. आगामी हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार लव्ह जिहादबाबत कोणताही कायदा मांडणार आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “आम्ही या विषयावर अजूनही चौकशी करत आहोत. आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, लव्ह जिहादविरोधात इतर राज्यांनी काय निर्णय घेतला आहे, याचा आम्ही अभ्यास करत आहोत.”