Nagpur | नागपूर : बाजार किंवा पार्कींगमधून दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण अचानक वाढल्याने, गुन्हे शाखेच्या पथकाने जास्त दुचाकी चोरी होण्याच्या स्थळांवर पाळत ठेवली. एका चोरट्याला दुचाकी चोरताना पोलीसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून तब्बल 111 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.
आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली. ललित गजेंद्र भोगे (वय २४, रा. विकासनगर, कोंढाळी) असे दुचाकी चोर आरोपीचे नाव आहे. अनिल पखाले (रा. वाडी) यांची दुचाकी 21 डिसेंबर 2023 रोजी चोरीला गेली होती. सदर गुन्ह्याच्या तपासात त्या परिसरातून अनेक दुचाकी चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. शहरात वाहनचोरीचे प्रमाण वाढल्याने अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले यांनी तपास कार्य सुरू केले. वाहन चोरीच्या घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिसांनी वाहन चोरीची प्रमुखस्थळे शोधली 250 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनेक दिवसांचे फुटेज तपासले. त्यात आरोपी ललित भोगे हा काही ठिकाणी आढळला. तो शहरातील दुचाकी बाहेर घेऊन जाताना दिसला. मात्र वाडीनंतर आरोपी कुठे जातो, हे कळू शकत नव्हते. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने ई-सर्व्हेलन्सद्वारा तपास केला असता कोंढाळीचे नाव समोर आले. तेथे तपास केल्यावर ललीत भोगे आढळून आला. त्याच्याकडे संशयित वाहनही होते. सुरुवातीला भोगे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या घरातून २० चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, गुन्हे शाखेचे उपायुक्त निमित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले, दिपक रिठे, अजय शुक्ला, पंकज हेडाऊ, राहुल कुसरामे आणि सायबरचे बलराम झाडोकार यांनी हि कारवाई केली.
आरोपी ललीत भोगे याने दुचाकी चोरीसाठी विदर्भातील नऊ जिल्हे निवडले होते. अकोला, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातून त्याने दुचाकी चोरल्या. तसेच वाडी येथून (11), धंतोली (8), सीताबर्डी (3), नंदनवन, एमआयडीसी, कोराडी आणि इमामवाड्यातून 28 दुचाकी भोगे याने चोरी केल्या. दुचाकी चोरल्यानंतर खेड्यात जाऊन 10 – 15 हजारात दुचाकीची विक्री करीत होता.
ललित भोगे याने एका तरुणीशी प्रेमविवाह केला. या विवाहाला त्याच्या कुटुंबियांचा विरोध होता. लग्नानंतर तो कोंडाळी येथे राहायला गेला. संसार सुरु झाल्यानंतर आर्थिक अडचणी येऊ लागल्या. पत्नी त्याला पैसे आणण्यासाठी तगादा लावू लागली. त्यामुळे ललितने दुचाकी चोरीचा धंदा सुरु केला. यात यश आल्यानंतर त्याने जवळपास 3 हजारांहून अधिक दुचाकी चोरल्याचा पोलीसांना संशय आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.