भंडारा : अकोला पाठोपाठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या भंडारा येथील उड्डाणपुलाला तांत्रिक कारणांमुळे बंद करावे लागले आहे. आठ महिन्यांपूर्वी केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लाखनी येथील या पुलाचे लोकार्पण झाले होते.
बांधकामात तांत्रिक दोष समोर आले आहेत. पुलाचा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा उड्डाणपूल पुढील दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. उड्डाणपुलाची निर्मिती करणाऱ्या जेएमसी कंपनीचे भंडारा ते साकोलीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरील एकेरी मार्ग बंद करण्याबाबतचे पत्र जारी करण्यात आले आहे. साडेतीन किलोमीटर लांबीच्या या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ३१२ कोटींचा खर्च करण्यात आला असून या पुलावरून दररोज ५ हजार वाहनांची वर्दळ असते. साकोली येथे आठ महिन्यापूर्वी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात नितीन गडकरी यांनी या पुलाच्या बांधकामासोबतच वापरण्यात आलेले साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असून या उड्डाणपुलाचे बांधकाम म्हणजे स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजीचे असल्याचे सांगून यावर्षी उत्कृष्ट बांधकामाच्या पुरस्कारासाठी या पुलाचा नक्की विचार करू, अशी स्तुती केली होती.
सहा लेनचा हा उड्डाणपूल आहे. पुलाच्या खाली चार लेन आणि दोन सर्व्हिस लेन आहेत. पुलावरील एक साईड बंद होत आहे. नागपूर ते रायपूरकडे जाणारी वाहतूक पुलाखालील लेनवरून सुरू होणार आहे. याबाबत पत्र बांधकाम करणाऱ्या जेएमसी कंपनीने लाखनीच्या ठाणेदारांना दिले असून उड्डाणपुलाच्या खालून सर्व्हिस रोडने वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे.