वाशीम : एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी असे चित्र बघायचे असेल तर वाशीम जिल्ह्यातील गणेशपूर येथील जिल्हा परिषद शाळेत एकदा नक्की जाऊन या. जिल्हा परिषदेच्या गणेशपूरच्या या शाळेत केवळ गुरू-शिष्य दोघेच दररोज येतात.
गणेशपूरची ही शाळा कारंजा तालुक्यात आहे.दीडशेच्या आसपास गावची लोकसंख्या. गावात एकूण २० परिवार राहतात. गावातील तीन मुले कारंजा येथे शिक्षणासाठी जातात. गावात असलेल्या मुलांपैकी कार्तिक बंडु शेगोकार हा एकच विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो. त्यामुळे गुरूजी फळ्यावर लिहितात ‘पटावरील संख्या एक, हजर एक गैरहजर शून्य…’ कार्तिक आणि त्याचे गुरू किशोर मानकर दररोज शाळेत येतात. एखाद्या दिवशी गुरूजींना किंवा कार्तिकची प्रकृती बरी नसली तर शाळेला अघोषित सुटी असते.
गावाची लोकसंख्या कमी असल्याने मुलांची संख्याही कमी आहे. परंतु जे विद्यार्थी गावात आहेत, ते कारंजाच्या शाळेत शिकतात. फक्त कार्तिक इयत्ता तिसरीचे शिक्षण घेत आहे. महागड्या सीबीएसई शाळांचे वेड पालकांना लागले आहे. जास्तीत जास्त फी आणि ‘हायफाय लूक’ असलेल्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते असा गैरसमज असणाऱ्यांसाठी गणेशपूरची शाळा उत्तम उदाहरण आहे. जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगरपालिका आणि अगदी शासकीय अनुदानित शाळांकडे पालक पाठ फिरवित आहेत. त्यांच्यासाठी गणेशपूरची शाळा आदर्श ठरू शकते.