नागपूर : काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते. त्यासाठीच तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस इथून बाहेर काढतील आणि संधी मिळताच पळून जायचं अशी त्याची योजना होती, असा धक्कादायक खुलासा कुख्यात गँगस्टर जयेश पुजारी यांने केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी सातत्याने देणाऱ्या जयेशने नागपूर पोलिसांपुढे तोंड उघडले आहे.
पुजारीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी जेलमधुनच गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली होती. मात्र सध्या तरी पोलिस त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नाहीत. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास नागपूर पोलिस करीत आहेत. धमकीचे फोन करण्यामागे प्रकाश झोतात येण्याची योजना होती असे जयेश पुजारीने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितले. हत्येच्या दोन प्रकरणांमुळे जयेश पुजारीला झालेली फाशीची शिक्षा कमी होऊन त्याला जन्मठेप मिळाली आहे. जन्मठेप मिळाल्यामुळे जयेश पुजारीला आयुष्यभर तुरुंगातच राहावे लागेल. यामुळेच तो तुरुंगातून पळून जाण्याच्या योजनेवर काम करत होता. दरम्यान जयेशला तरुंगात फोन कुणी उपलब्ध करून दिला याबाबत अद्यापही अस्पष्टता कायम आहे.