अमरावती : भाजपला साथ देऊन आमची चूक झाली, अशा स्पष्ट शब्दांत प्रहार संघटनेचे तथा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आम्हाला कोणतीही कल्पना न देता अजित पवार यांचा शपथविधी करण्यात आला, असे ते म्हणाले.
आमदारांचा आकडा वाढत असल्यामुळे आपल्याला कुणी विचारत नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. संख्या वाढत चालली म्हणून आम्हांला विचारणे बंद केले आहे. परंतु हे योग्य नाही. आम्हाला कसलीही कल्पना न देता अजित पवार यांचा शपथविधी झाला. भाजपला साथ देणे चुकीचे ठरले आहे, अशी थेट नाराजी माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. बच्चू कडू म्हणाले की, अजित पवार यांनी निधी दिला नाही, म्हणून शिंदे गट वेगळा झाला, आता त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहे. आता ते आमचा निधी खेचणार यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांपेक्षा आमदारांची सध्या मोठी गोची सुरू आहे. या सर्व राजकीय उलथापालथीमुळे भाजपलाच जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे.