अकोला : महानगरातील रस्ते आधीच लहान आहेत, त्यात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण, सर्व नियम धाब्यावर बसवून चौकाचौकात ठिय्या मांडून बसणारे ऑटोचालक, रस्त्यावर दुचाकी- चारचाकी पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांमुळे रस्ते अधीकच लहान झाले आहेत. अशात वाहनांच्या गर्दीतून रस्त्यांवर स्वतःचा जीव वाचवत पायी चालणे अतिशय जिकरीचे काम आहे. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना अतिशय त्रास होतो.
महानगरातील फुटपाथची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणचे पेव्हर्स गायब झाले असून, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांचा अनधिकृत कब्जा असल्यामुळे फुटपाथ अदृष्य झाले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने मोहीम राबवून फुटपाथ मोकळे करून घेऊन, पेव्हर्स बसवून तसेच योग्य ती दुरूस्ती करून गैरसोय दूर करावी अशी त्रस्त पादचाऱ्यांची मागणी आहे.