नवी दिल्ली : अमेरिकेमधील केंब्रिज विद्यापीठात पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर ऋषी राजपोपाट यांनी संस्कृत व्याकरणकार पाणिनीने लिहिलेल्या ‘अष्टध्यायी’मधील व्याकरणासंदर्भातील चूक दुरुस्त केली आहे. हा शोध मानव आणि मशिनींमधील संवादाच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
चार हजार सुत्रांचा समावेश असलेल्या ‘अष्टध्यायी’ हा ग्रंथ संस्कृत भाषेमागील विज्ञान समजावून सांगतो. शब्द निर्माण करण्यासाठी यामध्ये नमूद करण्यात आलेले नियम हे समजून घेण्यास फारच कठीण आहेत. ग्रंथामधील माहितीच्या आधारे एखादा शब्द कसा तयार करावा किंवा संस्कृतमधील वाक्य कसं तयार करावं याचं मार्गदर्शन केलं जातं. मात्र यामध्येही बरेचदा पाणिनीचे दोनहून अधिक नियम एकाचवेळी वापरले जायचे आणि त्यामधून संभ्रम निर्माण व्हायचा. हा संभ्रम राजपोपाट यांनी दूर केला आहे.
डॉ. राजपोपाट यांनी लावलेला शोध हा क्रांतीकारी असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. या नियमांचा वापर केल्याने कंप्युटर्समध्ये पहिल्यांदाच पाणिनीचं व्याकरण फीड करता येणार आहे. ‘अष्टाध्यायी’मधील लिनियर आणि अगदी थेट नियमांमुळे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) सिस्टीमसाठीही याचा वापर करता येईल. जसा तो सध्या चॅटजपीटी बोटमध्ये केला जातो. भारतामध्ये संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या २५ हजार आहे. संस्कृत ही सर्व भाषांची मूळ भाषा मानली जाते. १८००च्या शतकापासून युरोपीयन लोकही संस्कृत भाषेचा अभ्यास करत आहेत.