Mumbai : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी संपल्याचे वक्तव्य केले होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आंबेडकरांचा दावा फेटाळला आहे.
राऊत म्हणाले काही ठिकाणी रणनीती म्हणून आघाडीतील पक्ष वेगळे लढणार आहेत. प्रकाश आंबेडकरांसोबत झालेल्या बैठकीत भाजपाला प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष मदत होईल, असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी सांगितले की, निवडणुकीत भाजपाला फायदा होईल, असे कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही, याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. भाजपचा पराभव करणे हेच एकमेव लक्ष्य व प्राथमिकता आहे. देशातील वातावरण बदलण्सासाठी आम्ही एकत्र राहणार. आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडी नेत्यांसोबत बैठक झाली. त्यांनी प्रसारमाध्यमांना काँग्रेस नेते आमदार नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यासमोरच इंडिया आघाडी संपल्याचे वक्तव्य केले. त्यावर सारवासारव करताना संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून काही मुद्दे आहेत. परंतु इंडिया आघाडी फुटलेली नाही. निवडणूक रणनीतीनुसार निर्णय होत आहेत. त्यामुळे पंजाब आणि बंगालमध्ये तसे निर्णय घेतले आहेत. दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप होणार आहे. पंजाबमध्ये मात्र स्वतंत्रपणे लढणार आहेत. ममता बॅनर्जी देखील भाजपच्या पराभवासाठी कार्यरत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सोबत झालेल्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी किमान-समान कार्यक्रम ठरवण्याची मागणी केली असून काही सुचना देखील केल्या आहेत. किमान-समान कार्यक्रमावर निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.