अकोला : डाबकी रोडवरील स्टेट बँक शाखेचा कारभार विचित्र झाला आहे. वेळोवेळी बँकेच्या नियमात बदल होत आहेत. अनेक ग्राहक या बाबत अनभिज्ञ असतात. त्यांना काही अडचण निर्माण झाल्यास योग्य मार्गदर्शन करण्यात येत नाही.
केवायसीसाठी तसेच नवीन खाते उघडण्यासाठी तासंतास ताटकळत ठेवण्यात येते. पासबुक अपडेट करणारी व पैसे भरण्यासाठी लावण्यात आलेल्या मशीन बंद राहते. एसएमएस येत नाहीत. सर्व्हर बरेच वेळा कार्यान्वित नसते, त्यामुळे ग्राहकांना त्रास होतो. अशाच प्रकारचे अनेक त्रास खातेदारांना सोसावे लागत आहेत. महिन्याच्या सुरुवातीचे दहा – पंधरा दिवस पेन्शनर लोकांची गर्दी असते. नेमके याच वेळी फक्त एक काऊंटर सुरू असते. त्यामुळे जेष्ठ नागरिकांचे हाल होतात. समस्यांबाबत शाखा प्रबंधकांची भेट घेतली असता, पूर्वी सात कर्मचारी शाखेत होते, आता पाच असल्याची माहिती देण्यात आली. ग्राहकांना योग्य सेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ग्राहकांना खात्यातून पैसे काढावयाचे असल्यास एटीएम व बँकेच्या ग्राहक सुविधा केंद्रातून काढावे असे आवाहन त्यांनी केले. भौगोलिकदृष्ट्या जुने शहराचा विस्तार मोठा आहे. भारतीय स्टेट बँकेने हरिहर पेठ किंवा गंगानगर परिसरात नविन शाखा सुरू करावी, जेणेकरून ग्राहकांचा त्रास कमी होईल, अशी मागणी होत आहे. बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने यात जातीने लक्ष घालणे गरजेचे झाले आहे.