Home » अमरावतीत किन्नरांच्या वस्तीतही नवरात्रीचा उत्साह

अमरावतीत किन्नरांच्या वस्तीतही नवरात्रीचा उत्साह

by नवस्वराज
0 comment

अमरावती : विदर्भातील सांस्कृतिक शहर असणाऱ्या अंबानगरीतील निंभोरा परिसरात असणाऱ्या किन्नरांच्या वस्तीतही नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. किन्नरांच्या वस्तीमध्ये सर्व किन्नर मिळून एका घरात घटस्थापना करण्यात आली. किन्नरांची अपार श्रद्धा असणाऱ्या यल्लम्मा आणि बहुचर मातेची स्थापना करून त्यांची दररोज विधिवत पूजा केली जाते. नवरात्रीनिमित्तानं त्यांच्या गुरुमातादेखील आल्या आहेत. नवमीला होम हवन सोहळ्याला अमरावतीसह अनेक भागातील किन्नर या उत्सवात सहभागी होतील.

नवरात्रौत्सव काळात किन्नरांच्या घरातील देवींचा आशीर्वाद घेण्यासाठी अमरावती शहरातील अनेक भाविक येत आहेत. नवरात्रौत्सव काळात किन्नरांचा आशीर्वाद हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेदेखील अनेक कुटुंब किन्नरांच्या घरी देवीसह किन्नरांचाही आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करत आहेत. महाराष्ट्रात आपण ज्या देवीला रेणुका माता म्हणतो, त्या देवीलाच दक्षिणेत यल्लमा देवी म्हणून ओळखलं जाते. देशभरातील सर्वच किन्नर यल्लमा देवीचे उपासक आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त किन्नर समुदायाच्या वतीनं अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सुंदर कांड, भजन गोंधळ असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व धार्मिक सोहळ्यात अनेक भागातील भाविकदेखील सहभागी होत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!