अकोला : महानगरातील काँक्रिटिकरण करण्यात आलेल्या सर्व प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नागरिकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. भरीसभर म्हणजे गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर लाकडी बल्ल्या आणी बांबूचे बॅरिकेड्स लावण्यासाठी कंत्राटदाराने रस्त्यांवर खड्डे केले आहेत. ते बुजवले नाहीत. मिरवणुकीआधी रस्ता जोडण्यासाठी डांबर मिश्रित चुरी टाकण्यात आली. परंतु दबाई न केल्यामुळे पुन्हा जैसे थे झाले. भुयारी मार्ग चालू – बंद असतो. उड्डाणपुलाचे काम बंद पडले आहे.
प्रमुख रस्त्यांच्या कामाच्या दर्जा निकृष्ट असल्याबद्दल खुप ओरडा झाला काँक्रिटिचे मिश्रण टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न देखील झाला परंतु तो सफल झाला नाही. नवीन रस्ता व पुलाचे काही आयुर्मान असते. त्या आधी दोष निर्माण झाल्यास कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करता येते. निकृष्ट रस्त्यांच्या निरीक्षणासाठी समिती बनवण्यात आली परंतु कारवाई मात्र शून्य आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांवर काँक्रिटचा कायमस्वरूपी इलाज करणे शक्य नसल्यास पूर्वीप्रमाणे रस्त्याचे डांबरीकरण करून नागरीकांचा त्रास दूर करावा अशी त्रस्त नागरीकांची मागणी आहे.