गडचिरोली : आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली येथील नवोदय विद्यालयात शिक्षण झालेले आयएएस अधिकारी नीरज कुमार बन्सोड यांची सहकार मंत्रालयात गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने बन्सोड यांच्या नियुक्तीला नुकतीच मान्यता प्रदान केली आहे.
नीरज बन्सोड यांची नियुक्ती या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून किंवा सह-टर्मिनस झाल्यापासून २९ सप्टेंबर २०२७ पर्यंतच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून हे आदेश काढण्यात आले आहेत. बन्सोड हे २००८च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील छत्तीसगड कॅडरचे अधिकारी आहेत. सध्या ते कॅबिनेट सचिवालयात संचालक म्हणून कार्यरत आहेत. बन्सोड मूळचे महाराष्ट्राचे असून त्यांनी बी.ए. उत्पादन अभियांत्रिकी मध्ये केले आहे. त्यांनी बिलासपूर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सुकमाचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.
नक्षलग्रस्त सुकमा आणि जांजगिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली. ज्या जिल्ह्यात दिवसा मुख्य रस्ते बनवणे शक्य नसते अशा नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात त्यांनी रातोरात रस्ते बनविण्याचा विक्रम केला. सध्या ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते.त्यांची नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली आहे.
नीरज यांचे सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण नक्षलग्रस्त,आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील नवोदय विद्यालय,घोट येथे झाले. १९८८ मध्ये त्यांनी नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. १९८८ ते २००० पर्यंत म्हणजेच बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण नवोदय विद्यालय घोट येथेच झाले. त्यांचे वडील डॉ. बी. एस. बन्सोड १५ जून १९८७ ते ९ जून १९९३ पर्यंत गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २००४ पर्यंत त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून गडचिरोली जिल्ह्यात सेवा दिली.