चंद्रपूर : कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या घुग्गुस येथे अमराई वार्डातील गज्जू मडावी यांचे अख्खे घर 50 फूट खोल खड्ड्यात कोसळले. घराच्या आत एक लहान खड्डा पडला आणि झपाट्याने त्या खड्ड्याचा आकार मोठा होत गेला. काही भयानक होणार हे कळताच गज्जू आपल्या कुटुंबासाहित घराबाहेर निघाले आणि एका क्षणात घर जमिनीच्या आत कोसळले.
याच परिसरात इंग्रजांच्या काळातील भूमिगत कोळसा खाण होती. आता हे एक घर जमिनीखाली गेल्याने या परिसरातील नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. घटनेनंतर काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. इंग्रजांच्या काळात घुग्गुस येथे रोबर्टसन इन्कलाईन भूमिगत कोळसा खाण होती. देश स्वतंत्र झाल्यावर 1981 ला त्या खाणीला खुल्या मध्ये परावर्तित करण्यात आले. खुल्या खदाणीतून कोळशाचे उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी शहराचा विस्तार ही वाढला. नागरिकांनी खाणीच्या जवळ घरे बांधली. आजच्या स्थितीत संपूर्ण घुग्गुस शहर हे भूमिगत कोळसा खाणीच्यावर वसलेले आहे.
मडावी यांचे घर कोसळले तेव्हा या भागात जमिनील हादरे बसत होते. परिसरात भूकंपाचे झटके आले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेचा अभ्यास करण्यासाठी भूसंशोधन करणारी चमू दाखल झाली आहे.