Akola | अकोला : शहरातील भीरड मंगल कार्यालयात रविवार 24 डिसेंबरला हिंदू जनजागृती समितीच्यावतीने हिंदूराष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले. रणरागिणी शाखेच्या आनंदी वानखडे आणि अनिकेत अर्धापूरकर यांनी यात संवाद साधला. सभेची सुरुवात शंखनाद, गणेश वंदना तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. आनंदी वानखडे यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व शौर्य जागरणाचे महत्त्व सांगितले. (Hindu Janjagruti Samiti’s Anandi Wankhade Explained Importance Of Self Defense To Women In Akola) प्राचीन काळातील गार्गी, मैत्रेयी, लोपमुद्रासारख्या कर्तृत्ववान, वेदशास्त्र संपन्न महिला व अलीकडच्या काळातील राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, कर्नाटकातील राणी चेन्नमा अशा कर्तबगार महिलांचा इतिहास सांगितला. वर्तमान काळातील महिलांची स्थिती चिंताजनक आहे. हिंदू मुली, स्त्रियांना धर्मांध खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतरण करून नंतर वाऱ्यावर सोडून दिल्या जातात, अशी माहिती यावेळी देण्यात आली. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी महिलांनी धर्माचरण करावे. बलोपासना करावी, असे सांगण्यात आले. वानखडे यांनी महिलांना उठ भगिनी जागी हो..दुर्गा, चंडी..गार्गी हो.. अबला नको तू रणरागिणी हो..रणात लढणारी रणरागिणी हो.. असा मंत्र दिला.
विचार व्यक्त करताना अनिकेत अर्धापूरकर म्हणाले की, चांगल्या-वाईटाच्या लढाईत आपल्याला धर्माच्या बाजूने उभे रहायचे आहे. हिंदू जेंव्हा संघटितपणे राष्ट्रहितासाठी कार्य करतील तेंव्हा धर्मविजय निश्चित आहे. हिंदूधर्म श्रेष्ठ आणि सनातन आहे. जग हे एक कुटुंब असून सर्व सुखी होवो, अशी शिकवण देतो. असे असतानाही हिंदू धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचा संघटितपणे प्रतिकार करणे आवश्यक असल्याचे अर्धापूरकर यांनी सांगितले. वक्त्यांचा परिचय आणि सूत्रसंचालन अश्विनी सरोदे यांनी केले. सभेला मोठ्या संख्येने महिला व पुरूष उपस्थित होते.